Joshua 4

1राष्ट्रातील सर्व लोक यार्देनेपलीकडे गेल्यावर परमेश्वर यहोशवाला म्हणाला, 2प्रत्येक वंशातून एक असे बारा पुरुष लोकांमधून निवड, 3आणि त्यांना अशी आज्ञा देऊन सांग, यार्देनेच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्याठिकाणी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.

4मग यहोशवाने प्रत्येक इस्राएल वंशांतून एक असे जे बारा लोक तयार केले होते त्यांना बोलावले. 5यहोशवा त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कराराच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल वंशाच्या संख्येप्रमाणे एकएक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,

6म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हा दाखल होईल, आणि पुढे तुमची संताने विचारतील की, या धोंड्यांचा अर्थ काय आहे? 7तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंग झाले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशाप्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.

8यहोशवाच्या या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे त्यांनी यार्देनेच्या मध्यभागांतून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर आपल्या मुक्कामावर नेऊन ठेवले. 9तसेच यार्देनेच्या मध्यभागी कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथे यहोशवाने बारा दगड उभे केले; आणि ते आजपर्यंत स्मारक म्हणून तेथे आहेत.

10मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक घाईघाईने पार उतरून गेले. 11झाडून सर्व लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कराराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.

12रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश हे मोशेच्या सांगण्याप्रमाणे सशस्त्र होऊन इस्राएल लोकांपुढे पलीकडे गेले, 13युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहोचले. 14त्यादिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली, जसे ते मोशेचे भय धरीत होते तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्यांच्या सगळ्या हयातीत धरले.

15परमेश्वर यहोशवाला म्हणाला 16साक्षपटाचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर.

17त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनेतून निघून वर येण्याची आज्ञा केली. 18मग परमेश्वराचा कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पुन्हा दुथडी भरून वाहू लागले.

19पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला. 20यार्देनेतून उचलून आणलेले बारा धोंडे यहोशवाने गिलगाल येथे रचले. 21तो इस्राएल लोकांना म्हणाला की, पुढे जेव्हा तुमची मुलेबाळे आपल्या वडिलांना विचारतील, हे धोंडे कशासाठी आहेत?

22तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की, इस्राएल लोक ह्या यार्देनेतून कोरड्या जमिनीवरून चालत पार आले. 23आम्ही तांबडा समुद्र पार करेपर्यत, तुमचा देव परमेश्वर याने जसे तांबड्या समुद्राचे पाणी आटवून कोरडे केले, तसेच परमेश्वर तुमचा देव ह्याने यार्देनेचे पाणी तुंम्ही तिच्यातून चालत पार आला तोपर्यंत तुमच्यापुढून हटवले. ह्यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे, हे पृथ्वीवरील सर्व लोक जाणतील आणि तुमचा देव परमेश्वर याचे तुम्ही निरंतर भय धरावे.

24

Copyright information for MarULB